मायबोली
Wikipedia कडून
१६ सप्टेंबर १९९६ रोजी सुरु झालेली मायबोली.कॉम सगळ्यात जुनी मराठी वेबसाईट आहे. व्यक्तिगत वेबसाईट म्हणून सुरु झालेल्या, "मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा" एकत्र करणार्या या "छोट्याश्या" वेबसाईटवर आज ८४ हजारापेक्षा जास्त पानांचा मजकूर आहे आणि सरासरी दर महिन्यात (२००६) एक लाखाहून जास्त वेळा मराठी वाचक मायबोलीला भेट देतात. (संदर्भ: गुगल या शोधयंत्राने ४ ऑक्टोबर २००६ रोजी पूर्णपणे स्वतंत्ररित्या दाखवलेल्या माहितीनुसार)
या दहा वर्षात मायबोलीने महाजालावर अनेक नवीन पायंडे पाडले. पहिली मराठी शुभेच्छापत्रे, दहा वर्षे २४ तास सतत सुरु असणारी मराठी अंताक्षरी, पहिली मराठी ऑनलाईन कादंबरी, आंतरजालावरचे मराठी माणसांचे खुले व्यासपीठ: हितगुज, विवाहविषयक सदर: रेशीमगाठी, जगभरच्या भाविकांनी एकत्र साजरा केलेला आंतरजालावरचा गणेशोत्सव, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम आजही चालू आहेत. मायबोलीकर फक्त लेखनच करतात असे नाही तर वेगवेगळ्या वेळी प्रत्यक्ष भेटतात, सामाजिक उपक्रमात हातभार लावतात आणि सेवाभावी संस्थाची इतरानाही ओळख करुन देतात.
या सगळ्या यशामागे मायबोलीला वेळोवेळी मदत केलेल्या शेकडो स्वयंसेवकाचा मोठा हातभार आहे. संगणक आज्ञावली लेखन, स्वागत समिती, मदत समिती, नेमस्तक, दिवाळी अंक संपादक मंडळ, गणेशोत्सव समिती, वर्षाविहार समिती अशा विविध प्रकारे, १६ वर्षांपासून ते ८६ वर्षापर्यंत, अशा विविध वयाच्या स्वयंसेवकांनी मायबोलीवरचे आणि मराठी संस्कृतीवरचे आपलं प्रेम व्यक्त केले आहे.
नवीन दशकात पदार्पण करताना, या वर्षी मायबोलीने सुरु केलेले काही नवीन उपक्रम
- संवाद: वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या मराठी व्यक्तिंचा परिचय.
- दिवाळी अंक विक्री: परदेशात रहाणार्या मराठी वाचकांसाठी घरपोच दिवाळी अंक मिळण्याची सोय.
- छोट्या जाहिराती: मायबोलीच्या वाचकवर्गाचा मराठी वाचकांना आणि व्यावसायिकांना लाभ घेता यावा म्हणून विनामूल्य छोट्या जाहिराती
मायबोली.कॉम चे मुख्य कार्यालय अमेरिकेत बॉस्टन, मॅसॅच्युसेटस इथे आहे.