पंडित भीमसेन जोशी
Wikipedia कडून
पंडित भीमसेन जोशी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात आजमितीचे एक अग्रगण्य गायक आहेत.
|
||||
---|---|---|---|---|
उपाख्य | पंडितजी | |||
जीवनकाल | ४ फेब्रुवारी इ.स. १९२२ (गडग, धारवाड, कर्नाटक) |
|||
आई-वडिल | ||||
पती-पत्नी | ||||
गुरू | सवाई गंधर्व | |||
गायन प्रकार | हिंदुस्थानी शास्त्रीय गायन | |||
घराणे | किराणा घराणे | |||
कार्य | ||||
गौरव | पद्मश्री पुरस्कार संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार संगीताचार्य पुण्यभूषण पुरस्कार स्वरभास्कर पुरस्कार तानसेन पुरस्कार डॉक्टरेट डि. लिट्. |
अनुक्रमणिका |
[संपादन] संगीतशिक्षण
पंडितजींचे वडिल व्यवसायाने शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नसे आणि भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ग्वाल्हेर येथे दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले.सुरूवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जलंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे, ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशाप्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर येथे व्यतित केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या त्यांच्या वडिलांशी भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांच्या वडिलांनी भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ जे सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्याकाळातील परंपरेनुसार भीमसेन गुरूगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्यतेवढे ज्ञान आत्मसात केले. रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा ते स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि पुणे येथे आले.
आजही पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात.
[संपादन] कारकीर्द
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांनी कानडी आणि हिंदी भाषेतील काही उपशास्त्रीय गीते गाऊन पहिले ध्व्नीमुद्रण केले आणि पुढील काही वर्षांमध्ये त्यांनी शास्त्रीय गाण्यांचे पहिले ध्वनीमुद्रण केले. सवाई गंधर्वांच्या षष्ठाब्दी सोहळ्यानिमीत्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली.
त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीतील व्यस्तता वाढली. त्याकाळात त्यांनी भारताचे उडते गायक असे संबोधण्यात आले कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
पंडितजींना आधुनिक हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे किंवा ख्याल गायक म्हणतात. परंतू १९४० च्या दशकात त्यांनी लखनऊ मध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम ठुमरी गायकांकडून ती शिकून घेतली. आज ते दोन्ही पद्धतीने लीलया गातात. असे म्हणतात की ख्याल गायकीपेक्षा ठुमरी गायन अधिक कठिण आहे.
पंडितजींचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत परंतू त्याचे शिक्षण झालेल्या कर्नाटकात कर्नाटकी शास्त्रीय गायन परंपरा जोपासली जाते जी दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. भारतात शास्त्रीय गायनाच्या या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. त्यामुळे पंडितजी कर्नाटकी गायनातल्या काही गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवितात. त्यामुळे त्यांनी गायलेली काही गीते इतकी लोकप्रिय झाली की नविन पिढीला मूळचे कर्नाटकी गायन कृत्रिम/विचित्र जाणवते.
[संपादन] वैशिष्टे
[संपादन] मराठी अभंग
मराठीतील त्यांनी गायलेले अभंग अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे -
- माझे माहेर पंढरी
- इंद्रायणी काठी
- देह विठ्ठल
- आरंभी वंदिन अयोध्येचा राजा
- तुका आकाशाएवढा
[संपादन] गौरव
पंडितजींना आजवर अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले आहे ज्यामध्ये इ.स. १९७२ साली पद्मश्री पुरस्कार, इ.स. १९७६ साली संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, इ.स. १९८५ साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला. त्यांचे अमृतमहोत्सवी ध्वनीमुद्रण इ.स. १९८६ साली पार पडले. जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी त्यांना दिली तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादिंचा समावेश आहे. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित केले आहे. ते भरवित असलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रात पंडित भीमसेन जोशी अध्यासन स्थापण्यात आले आहे.
आजवर् त्यांनी केलेल्या सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडितजींचे स्थान अजरामर झाले आहे.
[संपादन] बाह्यदुवे
वर्ग: संगीतातील अपूर्ण लेख | अपूर्ण लेख | हिंदुस्थानी शास्त्रीय गायक | भारतीय शास्त्रीय गायक | मराठी गायक | कानडी गायक | भारतीय गायक | तानसेन पुरस्कारविजेते | पद्मश्री पुरस्कारविजेते | पद्मभूषण पुरस्कारविजेते | संगीत नाटक अकॅडमी पुरस्कारविजेते | पुण्यभूषण पुरस्कार विजेते | स्वरभास्कर पुरस्कार विजेते