मनाचे श्लोक (उत्तरार्ध)
Wikipedia कडून
...मनाचे श्लोक (पूर्वार्धापासून पुढे चालू)
जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥ जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥ सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥ जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥
नव्हे कर्म ता धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
करी काम निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥ करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥
अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
मना पावना भावना राघवाची । धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥ भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते । तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥
मना मत्सरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा निजध्यास राहो ॥ समस्तांमधे नाम हे सार आहे । दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१ ॥
बहू नाम या रामनामी तुळेना । अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो । उमेसी अती आदरे गूण गातो ॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे । परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥
विठोने शिरी वाहिला देवराणा । तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥
भजा राम विश्राम योगेश्वरांचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥ स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥
मुखी राम विश्राम तेथेचि आहे । सदानंद आनंद सेवोनि आहे ॥ तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥
मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामास भारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८६ ॥
बहू चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥ करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥ हरीचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥
न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥ हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी । बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥
नको वीट मानू रघूनायकाचा । अती आदरे बोलिजे राम वाचा ॥ न वेचे मुखी सापडे रे फुकाचा । करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥
अती आदरे सर्वही नामघोषे । गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥ हरी तिष्ठतू तोषला नामघोषे । निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥
जगी पाहता देव हा अन्नदाता । तया लागली तत्त्वता सार चिंता ॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥
तिन्ही कोप जाळू शके कोप येता । निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥ जपे आदरे पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥
अजामेळ पापी वदे पुत्रकामे । तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥ शुकाकारणे कुंटणी राम वाणी । मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे रामनामावळी नित्यकाळी ॥ पिता पापरूपी तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥
मुखी नाम नीही तया मुक्ति कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची ॥ पुढे अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥
हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवी देहधारी ॥ तया रामनामी सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥
जगी धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥ मुखे रामनामावळी नित्यकाळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥
यथासांग रे कर्म तेही घडेना । घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥ दया पाहता सर्व भूती असेना । फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥
जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥ म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥
अती लीनता सर्वभावे स्वभावे । जना सज्जनालागि संतोषवावे ॥ देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥
हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥ परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥
क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥ मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥
विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥ जनीं बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥ दया सर्वभूती जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥
मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥ क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं वादसंवाद सूखे करावा ॥ जगी तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे ॥ अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥
हिताकारणे बोलणे सत्य आहे । हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥ हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥
जनीं सांगता ऐकता जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥ उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥
जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥
तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा ॥ जनीं बोलण्यासारखे आचरावे । क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥
बहू शापिता कष्टला अंबऋषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥ दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥
धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे । कृपा भाकिता दीघली भेटि जेणे ॥ चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥
गजेदू महासंकटी वास पाहे । तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥ अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥ जना रक्षणाकारणे नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनि तयाकारणे सिंह जाला ॥ न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तया कारणे वामनू चक्रपाणी ॥ द्विजांकारणे भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥
अहल्येसतीलागी आरण्यपंथे । कुडावा पुढे देव बंदी तयाते ॥ बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥
तये द्रौपदीकारणे लागवेगे । त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥ कळीलागि जाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥
अनाथां दिनींकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे ॥ तया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥
जनांकारणे देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥ तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥
जगी धन्य तो राममूखे निवाला । कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥ देहेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥
मना वासना वासुदेवी वसो दे । मना वासना कामसंगी नसो दे ॥ मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥
गतीकारणे संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥ जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥
भजावा जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विनेकू ॥ १३१ ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥ बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥
हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी । जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥ तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥
नसे गर्व आंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥ नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥
धरी रे मना संगती सज्जनीची । जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे ॥ जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥ देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले । जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥
पुढे पाहता सर्वही कोंदलेसे । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥ अभावे कदा पुण्य गाठी पडेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाही । गुणे गोविले जाहले दुःख देही ॥ गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥