लिनक्स
Wikipedia कडून
लिनक्स ही एक युनिक्सशी साधर्म्य असणारी संगणक कार्यप्रणाली (' ऑपरेटिंग सिस्टिम)आणि तिचा गाभा (Kernel) आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेअर आणि मुक्तस्त्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. सर्वसाधारणपणे ज्या संगणक प्रणाली वितरणांना 'लिनक्स' म्हटले जाते त्यांचे 'ग्नू/लिनक्स' हे अधिक अचूक नाव आहे.
लिनक्स ही संज्ञा खरेतर लिनक्स गाभ्याला लागू पडते पण व्यवहारात ती या गाभ्याभोवती तयार झालेल्या लिनक्स वितरणासाठी वापरली जाते.
ही सुरुवातीला इंटेल-३८६ मायक्रोप्रोसेसरवर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक, तसेच 'एंबेडेड' स्वरुपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाईल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.
सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसीत केलेल्या लिनक्सला आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. IBM , HP - मोठ्या प्रमाणावर विकसित करीत आहेत. सेवा संगणक क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा विंडोज आणि युनिक्स यांच्यावर मात करुन मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासुन मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
लिनक्स गाभा प्रथम फिनलंडच्या लिनस टॉरवॉल्डस या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला अँड्र्यु टॅनेनबॉम यांनी लिहिलेली मिनिक्स कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसीत केली.
ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसीत झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर ग्नू सार्वजनिक परवान्याच्या खाली आणण्यात आली.
टक्स पेंग्विन लिनक्सचे प्रतीक आहे.
[संपादन] नावाचा उच्चार
स्वत: लिनस टॉरवॉल्डस् च्या म्हणण्याप्रमाणे [१] 'लिनक्स' हा उच्चार योग्य आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये 'लिनक्स' हा उच्चार प्रचलित आहे. मात्र, बऱ्याच वेळा (विशेषतः भारतात) 'लायनक्स' हा उच्चार वापरला जातो.
[संपादन] 'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'
'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' ह्या नावांमधील वादाबद्दल येथे वाचा: ग्नू लिनक्स नामकरणाचा वाद (इंग्लिश)
[संपादन] वितरणे
लिनक्स वितरण हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वत:ची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. त्यामध्ये विशिष्ट कामासाठीच्या जादा संगणकप्रणाल्या आणि लिनक्स स्थापण्यासाथी काही साधने असतात. काही प्रसिद्ध वितरणे डेबिअन लिनक्स, रेडहॅट लिनक्स, युबुंटु लिनक्स, फेडोरा कोर लिनक्स, सुसे लिनक्स इत्यादी आहेत.
[संपादन] विकासासाठी कष्ट
'More Than a Gigabuck: Estimating GNU/Linux's Size' या लेखामध्ये रेडहॅट लिनक्स ७.१ या वितरणाच्या अभ्यासात असे दिसुन आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्त्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायीक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १०८ कोटी डॉलर इतका खर्च आला असता.
यातील बराच स्त्रोत(७१%) C भाषेमध्ये असुन C++, Lisp, Perl, Fortran, Python इत्यादी गणकभाषाही त्यात वापरल्या आहेत. यातील अर्ध्याहून जास्त ओळी ग्नू परवान्याखाली आहेत. लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्त्रोत आहे. जो संपूर्ण वितरणाच्या ८ टक्के आहे.
नंतरच्या एका अभ्यासात( 'Counting potatoes: the size of Debian 2.2') डेबिअन लिनक्स २.२ या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्त्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायीक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १९० कोटी डॉलर इतका खर्च आला असता.
[संपादन] लिनक्सवरील प्रणाली
पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान स्थापना तसेच स्वरुपण करण्यासाठी लागत होते. त्यामुळे आंतर्भागातील पोहोचीमुळे बरेच तांत्रिकदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. पण अलिकडिल काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितारणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्विकार यामुळे इतर क्षेत्रातील लोकही लिनक्स वापरत आहेत.
सेवा संगणक क्षेत्रात ( लिनक्स, अपॅचे वेब सर्व्हर(Apache web server), मायसीक्वेल (MySQL) डेटाबेस व PHP/पर्ल (Perl)/पायथन(Python) प्रोग्रॅमिंग_लँग्वेज ) ह्या सॉफ्टवेअर्सचा संच LAMP म्हणून नावाने प्रसिध्द आहे.
[संपादन] महत्वाचे फायदे.
लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
१. ग्नू/लिनक्स हे पूर्णपणे मुक्त_सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे मुक्त सॉफ्टवेअरचे सर्व अंगभूत फायदे उपलब्ध आहेत. (उदा. बदल करण्याचे , पुनःप्रसारण करण्याचे स्वातंत्र्य )
२. अनेक लिनक्स वितरणे ही विनामूल्य अथवा अतिशय माफक किंमतीला उपलब्ध आहेत.
३. बहुतेक वितरणांबरोबर अनेक प्रकारची उपयोगी सॉफ्टवेअर्स विनामूल्य दिली जातात.
४. Performance Level, सुरक्षितता (Security) ह्या बाबतींत लिनक्स ही इतर संगणक प्रणाल्यांपेक्षा (उदा. मायक्रोसॉफ्ट विंडोज)अधिक प्रगत आहे.
[संपादन] काही सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे
1. मला लिनक्स कुठे मिळेल ?
सामान्यपणे लिनक्स हे डाउनलोड करता येते. पहा : लिनक्स वितरणे