सोयबीन
Wikipedia कडून
[संपादन] सोयबीन लागवड
सोयाबीन पिकाकरीता लागणारी जमिन - १) मध्यम स्वरुपाची २) भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी ३) उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली ४) चोपण व क्षारपड जमिन वापरू नये ५) पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये ६) जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी. ७) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी. ८) एकदम हलक्या मरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.
सोयाबीन लागवडीचे सुधारित तंत्र - सोयाबीनच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, लालसर, गाळाची किंवा पोयट्याची जमीन योग्य असते. जमिनीचा सामू साधारणपणे 6.5 ते 8.5 पर्यंत असल्यास, सोयाबीनची वाढ उत्तम होते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल जमीन, मोकळ्या हवेची, अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली, सेंद्रिय पदार्थ मुबलक असलेली जमीन चांगली असते. इतर अन्नघटकांचा साठा समतोल असणे जरुरीचे असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास हे पीक उत्तम येते.
सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी भुसभुशीत जमीन अधिक चांगली असते. त्यासाठी उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून पहिल्या पावसानंतर वापशावर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. कुळवाची शेवटची पाळी देण्यापूर्वी शेतात हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. त्याप्रमाणे शेतातील अगोदरची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ ठेवावे. सरीवर पेरणीसाठी 2.5 ते 3 फुटांवर सऱ्या पाडाव्यात. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी, असते तेथे हे पीक वापशावर पेरून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. सोयाबीनच्या पिकास फुले येण्याच्या वेळी व शेंगांमध्ये दाणे भरते वेळी पाण्याची फारच गरज असते. फवारा पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची 30 टक्के बचत होऊन उत्पादनातही वाढ होते. फवारा पद्धतीने पाणी दिले असता जमीन भुसभुशीत राहून पिकाच्या मुळ्या खोलवर जाण्यास मदत होते व जमिनीत हवा खेळती राहून पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
सुधारित जाती महाराष्ट्रातील जमीन व हवामान यांना अनुकूल असणाऱ्या जातींचाच पेरणीसाठी वापर करावा. कृषी खात्याने शिफारस न केलेल्या जाती परप्रांतातून आणून त्याची महाराष्ट्रात लागवड करू नये. त्याचा वाईट परिणाम होऊन नवीन रोग महाराष्ट्रात येण्याची भीती असते.
महाराष्ट्रासाठी सोयाबीनच्या जाती ः डी.एस.-228, एमएसीएस- 124, एमएसीएस- 450, एनएसओ 111 (मधू), जेएस- 335, पी.के.- 1029, पी.के.- 472.
पेरणीचा कालावधी खरीप हंगामात 100 ते 125 मि. मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी 10 जूनपासून 15 जुलैपर्यंत वापशावर करावी. 15 जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात थोडीशी घट येते. शक्यतो सोयाबीनची पेरणी 30 जुलैनंतर करू नये.
पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वापरावे. बियाण्याची उगवणशक्ती 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाणे त्याप्रमाणे वाढवावे. बियाणे प्रमाणित नसल्यास पेरणीपूर्वी एक आठवडा बियाण्याची उगवणशक्ती तपासून पाहावी. बियाण्याची उगवणशक्ती 60 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाणे पेरणीसाठी वापरू नये. सोयाबीनचे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतातील झाडांची संख्या कमी असणे हे होय. सोयाबीनच्या झाडांची संख्या प्रति हेक्टरी 4 ते 5 लाखांपर्यंत असावी. झाडांची ही संख्या योग्य राहण्यासाठी हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. सरीवर दोन ओळी पेरण्यासाठी हेक्टरी 50 किलो बियाणे वापरावे. आडसाली उसात जर आंतरपीक म्हणून लागवड करावयाची असेल, तर हेक्टरी 25 किलो बियाणे वापरावे. पेरणी उशिरा करावयाची वेळ आल्यास किंवा टपोऱ्या दाण्यांची जात असल्यास पेरणीसाठी प्रति हेक्टरी 10 किलोपर्यंत अधिक बियाणे वापरावे.
जिवाणू खते व बीजप्रक्रिया बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी तसेच बियांची उगवण अधिक होण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा खोडकिडीचा उपद्रव होऊ नये म्हणून हेक्टरी 10 किलो फोरेट (10 जी) जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी 150 ते 250 ग्रॅम जिवाणू खत (ब्रॅडी रायझोबियम जॅपोनिकम) 300 मि. मि. पाण्यात मिसळून त्याचे दाट द्रावण करावे. एक एकरासाठी लागणाऱ्या 30 किलो बियाण्याला हे द्रावण हाताने चोळून लावावे.
वरील बियाणे थोडा वेळ सावलीत सुकल्यानंतर ताबडतोब पेरणी करावी. तसेच 7.5 किलो प्रति हेक्टरी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचे खत, शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पेरणीपूर्वी शेतात पसरावे. या खतामुळे जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होऊन पिकाला ते उपलब्ध होऊन उत्पादन वाढते.
भरखते चांगले कुजलेले किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 25 ते 35 गाड्या पेरणी अगोदर जमिनीत टाकून कुळवाच्या पाळ्यांनी जमिनीत चांगले मिसळावे. भरखतामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते.
वरखते सोयाबीनच्या पिकास माती परीक्षणानुसार हेक्टरी 20 किलो नत्र, 60 ते 80 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी दुचाडी पाभरीने द्यावे. त्याचप्रमाणे हेक्टरी 20 किलो गंधक, 25 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो बोरॅक्सची मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
पेरणी पेरणी पाभरीने दोन ओळींत 30 किंवा 45 सें.मी., तर दोन झाडांत 5 ते 7 सें.मी. अंतर राहील, अशाप्रकारे करावी. बियाणे 2.5 ते 3.0 सें.मी. खालीपर्यंतच पेरावे. यापेक्षा जास्त खोलीवर बी पडल्यास बियांची उगवण कमी होते.
सरीवर एक ओळ ः नेहमीप्रमाणे उसाच्या लागवडीसाठी 3 फुटांच्या (90 सें.मी.) सऱ्या पाडून वरंब्याच्या टोकावर, माथ्यावर/बगलेला सोयाबीनची एक ओळ टोकण करावी. सरीवर दोन ओळी ः या पद्धतीत 3 फुटांवर सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बगलेला सोयाबीनची टोकण/लागवड करावी. दोन्ही बगलेला लागवड केल्यामुळे सोयाबीनच्या
रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहून उत्पादनात वाढ होते. यामुळे नत्राचे स्थिरीकरण जास्त प्रमाणात होऊन जमिनीत असलेल्या ओलाव्याचा व अन्नद्रव्यांचा योग्य वापर होऊन उत्पादनात 30 टक्के वाढ होते.
आंतरमशागत तणांच्या नियंत्रणाखाली पेरणीच्या वेळेस प्रति हेक्टरी 2.5 लिटर (बासालीन) फ्लुक्लोरॅलिन किंवा 4 लिटर लासो (ऍलाक्लोर) तणनाशके 800 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावीत. पीक 15 ते 20 दिवसांचे असताना एक कोळपणी व 25-30 दिवसांनी पहिली व 40-45 दिवसांनी दुसरी खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
रोगनियंत्रण मूळकुजव्या रोग येऊ नये, म्हणून बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बेन्डॅझिमची प्रक्रिया करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (75 डब्ल्यू.पी.) एक किलो प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी 1 लिटर टील्ट (प्रोपिकोनॅझोल) या बुरशीनाशकांची 800 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून पीक 25, 35 व 45 दिवसांचे असताना फवारणी करावी.
कीडनियंत्रण खोडमाशी, मावा, तुडतुडे व इतर पिकांच्या सुरवातीच्या काळात येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी उगवणीनंतर 7 दिवसांनी 100 ग्रॅम थायमेथोक्झाम 25 डब्ल्यूजी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने खाणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस, मिथोमिल, क्विनॉलफॉस (दीड मि.लि. प्रति लिटर) प्रमाणात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास डेल्टामेथ्रिन 300 ते 400 मि.लि. या प्रमाणात 700 ते 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी, मळणी व साठवण सोयाबीनची काढणी योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे असते. कापणी लवकर केली, तर अपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. तसेच कापणी उशिरा केली, तर शेंगा फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी सोयाबीनची पाने पिवळी होऊन शेंगा पक्व झाल्यावर पिकाची कापणी करावी. नंतर पीक विळ्याने कापून शेतातच 1-2 दिवस चांगले वाळवावे. वाळलेले सोयाबीनचे पीक खळ्यावर पसरून ट्रॅक्टरच्या चाकाखाली किंवा मळणी यंत्राच्या साह्याने मळणी करावी. बियाची डाळ होऊ नये म्हणून मळणी यंत्राचे आरपीएम 350 ते 400 पर्यंतच राहतील याची काळजी घ्यावी. मळणी झाल्यानंतर बी चांगले उफणून घ्यावे व नंतर 1-2 दिवस बियाणे उन्हात वाळवून पोत्यात साठवण करावी.
सुधारित पद्धतीने लागवड केल्यास साधारणपणे हेक्टरी 25 क्विंटल उत्पादन येते. प्रति हेक्टरी साधारणपणे उत्पादन खर्च 10,000 रुपये येतो. बाजारभाव सरासरी 1000 रुपये क्विंटलप्रमाणे धरल्यास एकूण उत्पादन हेक्टरी 25,000 रुपये येते. म्हणजे शेतकऱ्यांना निव्वळ नफा हेक्टरी 15000 रुपये होतो. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांनी हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन काढले आहे. सोयाबीन हे अल्पकालावधीचे पीक असल्याने ऊस, कापूस, तूर, फळबाग इत्यादीत आंतरपीक म्हणून घेता येते. तसेच हे द्विदलवर्गीय पीक असल्याने फेरपालटीचे पीक म्हणून ऊस, हरभरा, गहू यासारख्या रब्बी पिकाआधी घेता येते. त्यामुळे जमिनीचा कस व पोत सुधारण्यास मदत होते.
टिप - डी.एस.-228 जातीचे बियाणे कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध आहे.
[संपादन] अधिक माहितीसाठी संपर्कस्थाने
- एस.व्ही.करंजे
मोबाईल नंबर - 9850980118
- देवेंद्र शिरसाठ
के.व्ही.के.बारामती 02112-255207-227