वि. वा. शिरवाडकर
Wikipedia कडून
कुसुमाग्रज
पुरे झाले चंद्रसूर्य , पुरे झाल्या तारा पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल
चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते....
पुन्हा एकदा सांधते आहे
अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार...
- कुसुमाग्रज
(काव्यसंग्रहः छंदोमयी)
परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले ।
मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले ॥
परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी ।
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले ॥ १ ॥
स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही ।
तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही ॥
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे ।
त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही ॥ २ ॥
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती
संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
क्षितिजावर मी कधी पाहतो, मावळणारा रवी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही...
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही...
लगबग पाखरे ही
गात बघा गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहिकडे...
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या...
बाळाचे नी नाव घेता
जागी झाली चिऊताई
उडोनिया दूर जाई
भुर्र भुर्र...
एकदा ऐकले
काहींसें असें
असीम अनंत
विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यांतला आशिया
भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
छोट्या घरांत
घेऊन आडोसा
कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
जळ्मट जाळी
बांधून राहती
कीटक कोळी
तैशीच सारी ही
संसाररीती
आणिक तरीही
अहंता किती?
परंतु वाटलें
खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
जाणीव आहे
जिच्यात जगाची
राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
बारीक तात
ओतीत रात्रीत
प्रकाशधारा
तशीच माझ्या या
दिव्याची वात
पाहते दूरच्या
अपारतेंत!
अथवा नुरलें
वेगळेंपण
अनंत काही जें
त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....
प्रेरणा यांतून
सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
अंतरी झरे
त्यानेच माझिया
करी हो दान
गणावे कसे हें
क्षुद्र वा सान?
- कुसुमाग्रज
आला किनारा, आला किनारा....
निनादे नभी नाविकांनो इशारा...
उद्दाम दर्यामधे वादळी,
जहाजे शिडारून ही घातली...
जुमानीत ना पामरांचा हकारा,
आला किनारा ....
प्रकाशे दिव्यांची पहा माळ ही,
शलाका निळ्या लाल हिंदोळती,
तमाला जणू अग्नीचा ये फुलोरा,
आला किनारा....
जयांनी दले येथ हाकारली,
क्षणासाठी या जीवने जाळली,
सुखेनैव स्वीकारुनी शूलकारा,
आला किनारा....
तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी,
उभे अंतीच्या संगरा राहुनी,
किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा,
आला किनारा....
- कुसुमाग्रज
ता.क.- ही कविता देखिल माझ्याकडे लिखितस्वरुपात उपलब्ध नसल्याने एखाददुसरा शब्द चुकलेला असल्याची शक्यता आहे.
विहरलो वाऱ्यापरी मी कधीचा, तरी मी मुळी अनिरुद्ध नाही ।
लाभला मज कुणाचा संग नाही, तरी मी मुळी निस्संग नाही ।।
रचनेस माझ्या कोणताही बंध नाही, तरी तीही अनिर्बंध नाही ।
मी न गहिरे रंग भरले तरीही, चित्र माझे एकही बेरंग नाही ॥
सहजमनोहर वल्कलमंडित- विलास नवतीच्या विभवाचा
तपोवनाच्या धवल फुलावर-थेंब पडे हा विमल दंवाचा
गंधवती धरतीची कन्या- वृक्षांनी धरली हृदयावर
लालनपालन तिचे कराया- लवले पृथ्वीवरती अंबर!
नयनभाव तिज दिला मृगांनी- दिली फुलांनी गंधित आशा
मधुर अनघता दिली खगांनी- दिली झऱ्यांनी सलिल भाषा
जलवलयांतचि तिची कंकणे- अधरांवर अरुणाची लाली
रात्र गुंतली केशकलापी- रहावया ये वसंत गाली.
प्रणयाकुल हृदयांतील अवघ्या- ही स्वप्नांची काय सांगता
सहज भावमय नादरंगमय- पूर्णरुप ही पावे कविता
पूर्णताच खुपली शृंगारा- आश्रय शोधी तो करुणाचा
राजमंदिरी शेवट झाला - सृष्टींतील या रम्यपणाचा!
नको गं ! नको गं !
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -
धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून !
छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !
नको गं ! नको गं !
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोश होऊन
ढगात धूराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून -
दुर्बळ ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड !
पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन ! धावेन !
चला रे चक्रांनो,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपूला दरारा !
शिळ अन् कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून !
शिरली घाटात
अफाट वेगात
मैलांचे अंतर
घोटात गिळीत !
उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन
"दुर्बळ भेकड ! "
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी !
हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा !
उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश
उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती !
- कुसुमाग्रज
( पुणे १९३८ ) कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन.
विशाखा कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार.