लिथोग्राफ
Wikipedia कडून
शिळामुद्रण(Lithography):- शिळामुद्रणाचा शोध अलॉइज़ ज़ेनेफ़ेल्डर(Aloys Senefelder) याने १७९६ मध्ये लावला. ओशट पेन्सिलीने संगमरवरी दगडावर लिहिताना त्याच्या लक्षात आले की लिहिलेल्यावर शाई चिकटते, पाणी नाही. त्यामुळे सपाट शिळेवरील ओशट प्रतिमांना शाई व पाणी लावून कागद दाबून काढला की छपाई होते. शाई-पाणी लावणे, कागद दाबून पुढे सरकवणे वगैरे कामे यंत्राच्या साहाय्याने झपाझप होतात. असे छापखाने भारतात आत्ताआत्तापर्यंत होते, अजूनही असतील.
महाराष्ट्रातील काही सुरुवातीचे छापखाने:-"Society for Promoting the Education of the Poor within the Government of Bombay" अशा लांबलचक नावाची संस्था १८१५ मध्ये स्थापन झाली. १८२० मध्ये, म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतर दोनच वर्षांनी तिचे नांव "नेटिव्ह स्कूल बुक आणि स्कूल सोसायटी" असे झाले. माउंट स्ट्युअर्ट एलफ़िन्स्टन तिचे पहिले अध्यक्ष होते. सोसायटीच्या छापखान्यात शिळाप्रेसवर देवनागरीत मराठी व गुजराथी पुस्तके छापत. गव्हर्नरच्या संमतीने इ.स. १८२२ मध्ये पंचोपाख्यान, १८२३ मध्ये विदूरनीति आणि १८२४ मध्ये सिंहासनबत्तिशी ही मराठी पुस्तके छापली गेली.
सन १८२४ मध्ये मुंबईत सरकारी छपखाना झाला. त्यात सर्व शिळाप्रेसच होते. १८२९ साली नेटिव्ह सोसायटीमधून छापखान्यावर आलेले त्यांचे माजी सेक्रेटरी कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस यांची १८३० मध्ये पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी येताना एक शिळामुदणयंत्र आणले आणि पुण्यातील पहिला शिळाप्रेस चालू झाला. लिथोग्राफ़ीसाठी शिळा प्रथम परदेशातून येत, पण पुढे सेंट फ़ोर्ट जॉर्ज(मद्रास) येथील मुख्य अभियंते डब्लू. जेराड यांनी मद्रास प्रांतातील कर्नूल येथून उत्कृष्ट प्रकारच्या एक हजार शिळा छापखान्यासाठी उपलब्ध करून दिल्या.