अकोला जिल्हा
Wikipedia कडून
अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. जुलै १, ई.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पुर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
अकोला जिल्ह्यातील तालुके- अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर, अकोट, तेल्हारा अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] भूरुपे
अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. पूर्णा नदीच्या खोर्याचा बहूतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर आहेत, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे. भूरुपांच्या उंचसखलपणावरून प्राकृतिक रचना समजते.
[संपादन] प्राकृतिक विभाग
पाकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे पुढील विभाग पडतात.
[संपादन] गाविलगडचा डोंगराळ प्रदेश
या विभागात जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यांचा उत्तर भाग येतो.
[संपादन] अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश
जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. हा भाग बराचसा पठारी आहे. यात पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा भाग येतो.
[संपादन] पूर्णा नदीचा सखल प्रदेश
या प्रदेशात जिल्ह्याचा मध्यभाग येतो. यात मुर्तीजापूर, अकोला, बाळापूर तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग यांचा समावेश होतो. बार्शीटाकळी तालुक्याचा उत्तर भागही यात येतो.
[संपादन] नद्या
अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रुपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात . उमा, काटेपूर्णा, मोर्णा व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. वाशिम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी ,मुर्तीजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मुर्तीजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.
[संपादन] हवामान
अकोला जिल्हा समुद्रापासून दूर आहे. जिल्ह्याचे हवामान साधारण्पणे उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा फार कडक असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मुर्तीजापूर तालुक्यांत पाऊस कमी पडतो.
[संपादन] नैसर्गीक संपत्ती
अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डॊंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग , ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच चारोळीचे उत्पादनही होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.
[संपादन] पाणीपुरवठा
अकोला जिल्ह्यात विहीरी व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यांत विहीरी जास्त आहेत. तेल्हारा तालुक्यात वान प्रकल्प आहे. याशिवाय महान, मोर्णा हे प्रकल्प जिल्ह्यात आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील प्रकल्प जिल्ह्यात मोठा आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गुणा प्रकल्प आहेत.
[संपादन] पिके
जिल्ह्यात खरिप व रबी हंगामात वेगवेगळी पिके होतात.
[संपादन] खरिप पिके
अकोला जिल्ह्यात कापूस हे महत्वाचे खरिप पीक आहे. अकोला, तेल्हारा ,मुर्तीजापूर, बाळापूर, अकोट या तालुक्यांत कापसाचे पीक जास्त होते. या शिवाय इतर तालुक्यांतही कापूस होतो. खरिप ज्वारीच्या उत्पादना अकोला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे . ज्वारीचे पीक अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांत सर्वात जास्त प्रमाणात घेतल्या जाते.
याशिवाय मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद, सोयाबीन आदी खरिप पिके जिल्ह्यात घेतली जातात.
[संपादन] रबी पिके
रबी हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, जवस, करडई, आदी पिके होतात. जिल्ह्यात बागायती शेती सुध्दा थोड्याप्रमाणात होत असुन त्यात मुख्यत: संत्री, मिर्ची, ऊस, केळी, पेरू, बोरे, पपई आणि टरबुज आदी पिके घेतली जातात. तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन होते.
[संपादन] वाहतूक व व्यापार
अकोला जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व लोहमार्गाने चालते.
[संपादन] रस्ते
[संपादन] राष्ट्रीय महामार्ग
मुंबई - नागपूर - कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर, अकोला, कुरणखेड, मुर्तीजापूर, इत्यादी ठिकाणे आहेत,
[संपादन] प्रमुख रस्ते
तेल्हारा ते मंगरूळपीर मार्ग : तेल्हायाहून शेजारच्या वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ्पीरकडे हा मार्ग जातो. या मार्गावर अंदुरा, अकोला, बार्शीटाकळी, महान आदी ठिकाणे आहेत. अकोट- वाशिम मार्ग : या मार्गावर पाटसूळ, चोहट्टा, अकोला, पातूर इत्यादी ठिकाणे आहेत. मुर्तीजापूरहून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर कडे व कारंजामार्गे यवतमाळकडे मार्ग जातात.
[संपादन] लोहमार्ग
जिल्ह्यात अकोला व मुर्तीजापूर हे दोन महत्वाचे जंक्शन आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात.
- मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मुर्तीजापूर आदी स्थानके आहेत.
- खांडवा - पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशिमहून हिंगोली मार्गे पूर्णाकडे जातो.
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |